Wednesday 30 August 2017

‘निर्णया’मधील भावना

निर्णय घेण्याबाबत रवींद्रनाथ टागोरांनी अतिशय छान लिहून ठेवलय. ते म्हणतात....

निर्णय घेताना मन दोलायमान झाले तरी चालेल,
निर्णय चुकीचा झाला तरी एक वेळ चालेल,पण निर्णय घेताच येऊ नये ह्यासारखे दुर्भाग्य कुठले?

आणि खरोखरच निर्णय घेताना ‘हो का नाही?’ ‘चूक का बरोबर?’अशी मनाची दोलायमान परिस्थिती होऊ शकते.त्यातूनच निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु होते.कधी निर्णय बरोबर ठरतात तर कधी चुकतातही... पण निर्णय घेता न येण्यासारखी परिस्थिती मात्र सर्वात खेदजनक नाही का? काही निर्णय भावनांच्या भरात घेतले जातात, तर काही निर्णय भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून घेतले जातात.दोन्हीही पर्याय खरतर दूरगामी परिणामांचा विचार केला तर योग्य नाहीत. निर्णय प्रक्रियेमध्ये आपण भावना बाजूला ठेवून फक्त विचारांच्या जोरावर (Rational) निर्णय घेतो ह्या जुन्या विचारप्रणालीला धक्का देणारे निष्कर्ष संशोधनातून निष्पन्न झाले आहेत.योग्य निर्णय कसा घ्यायचा?आपली निर्णयप्रक्रिया कशी काम करते? निर्णय घेताना आपण नक्की काय करत असतो? फक्त  चारांच्या जोरावरच आपण निर्णय घेतो का?मग निर्णयप्रक्रियेमध्ये भावनांचं काही स्थान आहे का ?GUT FEELING म्हणजे नक्की काय? ह्या व अशा अनेक प्रश्नांवर आणि निर्णयप्रक्रियांवर आता खूप अभ्यासपूर्ण संशोधन झाले आहे,चित्तवेधक प्रयोग झाले आहेत.त्यासंबंधी थोडेसे ...

इलिओट,अमेरिकेमधील एक अतिशय बुद्धिमान व नामांकित वकील..त्याच्या व्यवसायामध्ये अत्यंत यशस्वी. ऐन तिशीमध्ये त्याला दुर्दैवाने ब्रेन ट्युमर हा आजार होतो.कपाळाच्या मागच्या मेंदूमधील भागात एक लसुणाएवढी गाठ निर्माण होते.ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो.अद्ययावत रुग्णालयात त्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडते.डॉक्टरांतर्फे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे आणि ती गाठ पूर्णपणे काढल्याचे सांगण्यात येते. ऑपरेशन नंतर मात्र इलिओटचे आयुष्य अगदी बदलून जाते. व्यवसायामध्ये चुकीच्या दिशेने पावले पडावयास लागतात,केसेस मध्ये खूप चुका व्हावयास लागतात, करिअरला उतरती कळा लागते.पैशाच्या गुंतवणीबाबतही चुकीची पावले पडून खूपच नुकसान सहन करावे लागते.पतीपत्नी संबंधामध्ये दुरावा निर्माण व्हावयास लागतो.चुकांची पुनरावृत्ती होत असते.त्याच्या जवळच्या नातेवाइकांनाही अस्वस्थ आणि व्यथित करणारे आचरण त्याच्याकडून होत असते.आपल्या ह्या घसरणीचे कारण त्याला स्वतःलाही उमजत नसते.तसं बघितलं तर त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता ऑपरेशन आधी जशा होत्या तश्याच तल्लख असतात.त्याला काही मानसिक आजार अथवा व्याधी नाही ना हे बघण्यासाठी सर्व निष्णात डॉक्टरांकडे त्याची तपासणी केली जाते.सर्व रिपोर्ट्स पुर्णपणे नॉर्मल येतात.सर्वांनाच चक्रावून टाकणारी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण होते.अशा परिस्थितीत तो हतबल होऊन एकदा डॉ.दिमासिओ नावाच्या मेंदुशास्त्रज्ञाकडे भेटावयास जातो.दिमासिओ सुद्धा त्याची पूर्ण तपासणी करतो,पण सर्व नॉर्मल..! केबिन मधून बाहेर पडताना डॉक्टर त्याला एकच प्रश्न विचारतात... “इलिओट,आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा कधी भेटू शकतो? इलिओटला ह्या प्रश्नाला अचूक उत्तर देण्यासाठी एक योग्य दिवस आणि एक वेळ निश्चित करून सांगणे अपेक्षित असते.पण सांगताना तो पुढील आठवड्यातील पाच वेगवेगळ्या वेळा डॉक्टरांसमोर ठेवतो पण त्यामधील एक योग्य वेळ निवडून सांगू शकत नाही.मंगळवारी दहा वाजता,का बुधवारी चार वाजता का आणिक कुठल्या वेळी चालेल.. हे निश्चित करून सांगणे त्याला जमत नाही. इथे त्याला योग्य निर्णय घेणे,योग्य पर्याय अचूकपणे निवडणे अपेक्षित असते.पण अतिशय बुद्धिमान असूनही ते त्याला अजिबात जमत नसते.तो अविचारी नसतो.निर्णय घेताना लागणारी रुक्ष माहिती,data जमवण्याची प्रक्रिया उत्तम होत असते. पण त्यातून एकच योग्य पर्याय निवडणं अवघड होत असत. हा सर्व अनपेक्षित प्रकार बघून डॉक्टर दिमासिओ च्या डोक्यात लख्खं प्रकाश पडतो.. इलिओट,वर जे ऑपरेशन झालेले असते ते खरतर यशस्वी होते पण ट्युमर काढताना विचार निर्माण होणारा मेंदूचा भाग आणि भावनांचा उगम होणारा भाग ह्यांमधले पेशिजालाचे महत्वाचे दुवे कापले गेले असतात… म्हणजेच इलिओट च्या निर्णयप्रक्रियेमध्ये कुठेतरी बिघाड निर्माण झाला आहे,असे निष्पन्न होते.निर्णय घेता न आल्यामुळे किंवा चुकीचे निर्णय वारंवार घेतल्यामुळे त्याला व्यवसायात,विवाहबंधनात आणि पैशाच्या गुंतवणुकी मध्ये मोठा तडाखा बसलेला असतो.
निर्णय प्रक्रियेमध्ये आपण फक्त विचारांच्या जोरावर (Rational) निर्णय घेतो भावना तेव्हा बाजूला ठेव्याव्या लागतात ह्या जुन्या विचारप्रणालीला धक्का देणारे निष्कर्ष संशोधनातून निष्पन्न झाले आहेत.इलिओट च्या बाबतीत खऱ्या घडलेल्या गोष्टीमधूनही हाच निष्कर्ष प्रतीत होतो तो म्हणजे विचारांना भावनांची जोड नसेल तर घेतलेले निर्णय कमकुवत ठरू शकतात.भावना आणि विचार एकमेकांच्या विरुद्ध नसून एकमेकांना पोषकच असतात. निर्णयप्रक्रियेमधील भावनांचं स्थान काय ? हे शोधण्यासाठी एक असामान्य प्रयोग करण्यात आला .डॉ  मासिओने हा विख्यात प्रयोग केला होता. Gambling Experiment म्हणून हा प्रचलित आहे.

जुगाड प्रयोग (Gambling Experiment)

ह्या प्रयोगात पत्यांचे चार डेक्स ठेवलेले असतात (A,B,C,D).प्रत्येक व्यक्तीला त्या चार डेक्स मधून एकूण शंभर पत्ते न बघता एक एक करून कुठल्याही डेक मधून काढून जमवायचे असतात.त्या पत्त्यांच्या डेक्समधून जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पत्ते निवडण्याचं आव्हान त्यांना असतं. त्या डेक्स पैकी दोन डेक्स मध्ये काही पत्ते जास्त कमाई (भरपाई) म्हणजेच शंभर डॉलर मिळवून देणारे असतात परंतु त्याच डेक्स मध्ये जबरी पेनल्टी देणारेही पत्ते ठेवलेले असतात .बाकीच्या दोन डेक्स मध्ये कमी कमाई(भरपाई )म्हणजेच फक्त पन्नास डॉलर मिळवून देणारे पत्ते असतात पण ह्या डेक्स मध्ये अगदी क्षुल्लक पेनल्टी देणारे पत्ते असतात.कुठल्या  प्रकारचे पत्ते कुठल्या डेक मध्ये आहेत हे कुणालाच माहिती नसतं.आता दोन गट पाडले जातात.एका गटामध्ये पूर्वी मेंदूमध्ये विशिष्ठ भागाला इजा झालेल्या व्यक्ती असतात तर दुसऱ्या गटामध्ये पूर्णपणे निरोगी मेंदूचे कार्य असलेल्या व्यक्ती असतात.जास्त फायद्याचे पत्ते निवडण्याचा जुगाड (gambling) खेळ सुरु होतो आणि प्रयोगही...! सुरुवातीस वीस पत्ते निवडताना दोन्हीही गटामध्ये साधारण सारखेच नुकसान सहन करावे लागते.पण त्यानंतर मात्र निरोगी व्यक्ती पत्ते निवडताना मागे झालेल्या चुकांचा अंदाज घेऊन,Gut Feeling द्वारे कमी भरपाई पण कमी नुकसान देणा-या डेक्स मधून पत्ते निवडण्यास सुरुवात करतात. त्यामुळे उरलेल्या पात्यांमधून त्यांना भरपूर कमाई आणि कमी नुकसान सहन करावे लागते.ह्याउलट ज्यांचा भावनांशी संपर्क तुटलेला असतो अशा त्या व्यक्तींचा गट मात्र पूर्वीच्या चुकांमधून काहीच न शिकता जास्त भरपाई व जास्त पेनल्टी देण्याऱ्या डेक्स मधून पत्ते निवडत राहतात आणि शेवटी त्यांना जबरी नुकसान सहन करावे लागते. भावनांशी त्यांचा संपर्क तुटल्यामुळे त्या गटातील व्यक्ती चुकीचा निर्णय घेत राहतात.कुठल्या डेक्स मधून पत्ते निवडल्यास आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल आणि कमी नुकसान होईल ह्याचा अचूक कयास ते बांधू शकत नाहीत. ह्या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की अचूक निर्णय घेताना आपण विचार करणारा(तार्किक)मेंदूचा भागच फक्त वापरत नसून भावनांचा स्त्रोत असलेला भाग ही उपयोगात आणतो.भावनिक स्मरणशक्ती ही निर्णय घेताना,पर्याय निवडताना अत्यावश्यक ठरते. “हे आवडतंय का नाही”, “हे बरोबर का चूक”, “हे नुकसानीचे का फायद्याचे” “ह्यामध्ये धोका आहे अथवा नाही” ह्याबद्दल गतकाळच्या साठवलेल्या भावनिक नोंदींचा इथे मेंदूमधील दुव्यांच्या मार्फत उपयोग करण्यात येतो.ज्यांच्या मेंदूमध्ये ह्या दुव्यांमध्ये इजा झालेली असते त्या व्यक्ती अर्थातच योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत !

आता ह्या प्रयोगाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुयोग्य निर्णय घेताना कसा उपयोग करू शकतो ? आपण नित्यनेमाने छोटे-मोठे निर्णय सतत घेत असतो.अगदी “कुठले कपडे आज घालायचे” “दुकानात गेल्यावर कुठला ड्रेस निवडायचा”ह्या छोट्या निर्णयापासून “कुठले करिअर निवडायचे”,“कोणाशी लग्न करायचे” ह्या मोठ्या निर्णयांपर्यंत विविध प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात.असे निर्णय पूर्णपणे आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात.योग्य झाले तर ठीक पण अयोग्य झाले तर जबाबदारी आपलीच असते.आणि कधी कधी चुकीच्या निर्णयामुळे जीवनामध्ये जबर किंमत मोजावी लागते किंवा चुकीच्या निर्णयाचे पूर्ण खापर आपल्यावरच फोडले जाते.... 

असे असताना मग योग्य निर्णय कसा घ्यायचा? डॉ केप्लर ह्या जगतविख्यात खगोलशास्त्रज्ञाला हाच प्रश्न स्वतःच्या आयुष्यात “कुणाशी लग्न करायचे” हा महत्वाचा निर्णय घेताना पडला.विश्वातील ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींवर अदभुत संशोधन करणाऱ्या ह्या संशोधकासमोर ‘वधुसंशोधानाचे’ आव्हान आले होते. त्याच्यासमोर अकरा मुलींची स्थळं होती.त्यातून एक भावी पत्नी म्हणून निवडायची होती.हे आव्हान पेलताना योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी एक अफलातून गणिती फोर्मुला काढला.“The Marriage Problem”म्हणून तो फोर्मुला जगभर प्रसिद्ध आहे.अचूक निर्णय घेण्यासाठी आपण हा केप्लरचा फोर्मुला नक्कीच उपयोगात आणू शकतो.समोर असलेल्या अनेक पर्यायांमधून आपली भावी पत्नी किंवा पती निवडण्यासाठी,व्यवसायात योग्य सहायिका नेमण्यासाठी,अगदी खेळातील योग्य टीम निवडण्यासाठी ह्या फोर्मुलाचा उपयोग करता येऊ शकतो.हे कसं करायचं? कल्पना करा....तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सहाय्यक निवडायचा आहे.जवळ जवळ वीस जणांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत.केप्लर च्या फोर्मुला प्रमाणे तुम्ही त्यातील अंदाजे एक त्रितीयांश (३६.८%) म्हणजे सात जणांचाच इंटरव्ह्यू घ्यावयाचा.ह्या पहिल्या ग्रुप मधील तुमच्या मते सर्वात योग्य अर्जदाराची मनात नोंद करून ठेवा.त्यानंतर उरलेल्यांचा इंटरव्ह्यू घ्या.आता त्यामधील एखादा पहिल्या ग्रुप मधील ‘सर्वात योग्य’ पेक्षाही चांगला वाटला तर त्यालाच अंतिम म्हणून निवडा आणि तिथेच निवड प्रक्रिया थांबवा.Optimal Stopping म्हणजे निवड करताना कुठे थांबायच ह्याबाबत महत्वाच तंत्र इथं प्रतीत होते.गणिती विचारप्रक्रिया आणि Gut Feeling दोन्हीच्या समन्वयामुळे योग्य निर्णय घेण्यास मार्ग मोकळा होतो ... केप्लरला ही अकरा मधून योग्य भावी पत्नी निवडण्यास ह्याच उपयोग झाला..


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

No comments:

Post a Comment

How to make your anxiety work for you instead of against you

Anxiety is energy, and you can strike the right balance if you know what to look for. While some cases of anxiety are serious enough t...