तनय,एक कॉलेजवयीन मुलगा.हॉस्टेल मध्ये रहात होता.पंधरा दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली
होती.एके दिवशी संध्याकाळी त्याचा मित्र रोहन त्याला कॅम्पस मध्ये फेरफटका मारावयास
सांगण्यासाठी आला.
रोहन..अरे तनय,चल जरा दहा-पंधरा मिनीटं फिरून येऊ
तनय..अरे नको रे,मला अभ्यास करायचा आहे
रोहन ..दिवसभर अभ्यास झाला ना?मग चल जरा निवांत होऊया
तनय ..अरे पण पंधरा मिनिटाचा एका तास होईल....
रोहन ..कसा होईल..?
तनय..अरे झाला तर ? मग माझा अभ्यास अपुरा होईल..मग परिक्षेत कमी मार्क मिळतील
...मग घरचे मला ओरडतील...सर्वांची सतत भुणभुण ऐकावी लागेल..मग नंतर माझं लक्ष
अभ्यासात अजिबात लागणार नाही..मग मी पुढच्या परीक्षेत नापास होईन..मग सर्वजण पुढे..
मी मात्र मागे ..म्हणजे मग ..जीवन खल्लास...
तनयने सुरुवातीला काळजीग्रस्त विचार केले,ते कदाचित त्याला उगाचच वेळ
घालविण्यापासून परावृत्त करू शकले असते पण त्यानं नंतर चुकीच्या विचारांचा मार्ग
पकडला,काहीतरी अघटीत आणि भयंकर घडणार आहे असा काल्पनिक विचार केला आणि त्या
भयंकर विचार चक्रामध्ये तो पार गुरफटून जाऊन चिंतातूर झाला...
अशा प्रकारे चिंतातूर मुलं आणि प्रौढ सुद्धा काळजीग्रस्त विचारांच्या दुष्टचक्रात अडकू
शकतात.एका काळजीतून दुसरी चिंता..मग आणखी काळजी ..आणि पुढे काळजी बद्दल
चिंता...!!
चिंता म्हणजे खरतर “काय वाईट होऊ शकतं”? ह्या बद्दल मनातील विचारांची एक
मालिका.ह्या भावनेचं खरं कार्य आपल्याला सतर्क राहण्यासाठी,येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून
सावध होण्यासाठी आणि पुढे जाऊन त्यावर सक्षमतेने उपाययोजना करण्यासाठी नक्कीच
उपयुक्त आहे..पण..तनय प्रमाणे जर मनामध्ये काळजीग्रस्त विचारांची अविरत मालिका सुरु
झाली ..तर मात्र भल्या भल्यांचीही मनातील विचारांची ट्रेन भलत्याच दिशेने धावू
शकते.कुठल्याही नेमक्या उत्तराकडे न जाता ‘चिंता’मोकाट, दिशाहीन होऊन जाते. चिंता ह्या
भावनेचं कामच पुढे येणाऱ्या धोक्यांपासून वेळीच सावध होऊन प्रश्न सोडवणं.पण अविरत
चिंतायुक्त विचार मात्र मनाला प्रश्न सोडविण्याऐवजी सतत काल्पनिक धोक्यावरच लक्ष केंद्रित
करावयास लावतात.धोक्यांविषयी सतत काळजी करून,विचार करून, जसं काही चिंता कमी
होईल अशी विचारधारणा होऊन बसते. पण यामुळे उलटं त्या धोक्याचं भयंकरीकरण होतं.
लिझ रोमर आणि थोमस बोर्कोवेक ह्या मनोविज्ञानिकांनी ‘चिंता’ह्या भावनेवर गेली दोन दशकं
संशोधनपर प्रयोग केले आहेत.मनामध्ये ‘भयंकर विचारांची ट्रेन’ किती वेळ चालू राहते ह्यावर
सर्व काही आहे असं शास्त्रज्ञांना निष्पन्न झालं आहे.जेवढी जास्त वेळ तेवढी व्यक्ती चिंताग्रस्त
अधिक !
बोर्कोविक या शास्र्त्रज्ञानं विचारशैलीवर एक अफलातून प्रयोग केला.या प्रयोगात त्यानं अनेक
व्यक्तींना एखाद्या पूर्वी घडलेल्या किंवा खरोखर घडण्याऱ्या कुठल्याही विषयाबद्दल विचार
करावयास सांगितला.प्रयोग विविध टप्प्यात करण्यात आला प्रथम त्या व्यक्तीनं एक नेहमी
भेडसावणारा ‘विषय’ सांगायचा. मग त्या विषयामध्ये कुठला प्रश्न ‘चिंता’ निर्माण करणारा आहे
हे सांगायचं,त्यानंतर त्या प्रश्नाबद्दल एक काळजीग्रस्त विचार सांगायचा आणि शेवटी त्या
विचारावर सलग परत परत विचार करावयास सांगायचं. हे सर्व जो पर्यंत त्या प्रश्नाबद्दल
विचार संपतील तो पर्यंत चालूच ठेवायचं.शास्त्रज्ञाना ह्या प्रयोगातून असं निष्पन्न झालं की
चिंतातूर व्यक्तीमध्ये विचारांची मालिका खूपच प्रदीर्घ होती.सर्वात लक्षणीय म्हणजे आयुष्यात
घडलेल्या एखाद्या चांगल्या विषयाबद्दलही प्रश्न निर्माण करून त्यावर अविरत काळजीग्रस्त
विचार करताना त्यांच्यामध्ये दिसून आलं ! चिंतातूर व्यक्तीमध्ये मनात “भयंकर विचारांची
ट्रेन”जास्त काळ चालू राहते असं निष्पन्न झालं.
“अरे काळजी करू नकोस...”, किंवा “चिंता कशाला करतोस” अशा वाक्यांनी चिंता अजिबात
कमी होत नाही असं प्रयोगातून दिसून येतं.
या प्रयोगाचा धागा पकडून बोर्कोवेक हयाने चिंतेच्या दुष्टचक्रातून सहीसलामत बाहेर
पडण्यासाठी संशोधकांनी प्रयोगातून काही लक्षणीय उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यातील
पहिली अगदी सोपी उपाययोजना म्हणजे ‘आत्मभान’.कुठल्या गोष्टीमुळे, परिस्थिती मुळे
काळजी वाटावयास सुरुवात होते? हे नेमकं ओळखणं.काळजी,चिंता आणि घालमेल मनामध्ये
असताना शरीरावर त्या भावनांचे कुठले ठसे निर्माण होतात? त्यावेळी मनात कुठले विचार
असतात? ह्याचे निरीक्षण व आत्मपरीक्षण करणं.या दोन्ही गोष्टींमुळे चिंतेचं वादळ
सुरुवातीलाच रोखता येणं संभव होतं.आठ-दहा वर्षांच्या वरील मुलांमध्ये आपण त्यांना
‘चिंतेची मोजपट्टी’ तयार करावयास सांगू शकतो.कोणत्या विविध प्रसंगामध्ये त्यांना चिंतातूर
वाटतं व किती वाटतं हे १ ते १० अंकापर्यंत लिहावयास सांगा.१ म्हणजे अगदी थोडी चिंता
आणि १० म्हणजे खूप जास्त चिंता.उदा.काही मुलांना परीक्षेबद्दल फार भीती वाटते व ती
अतिशय चिंताग्रस्त होतात.अशा मुलांमध्ये आपण परीक्षेविषयी चिंतेबाबत ‘आत्मभान’ निर्माण
करू शकतो.ही भावना निर्माण होण्याअगोदर कोणते विचार मनात येतात,’मनातील संभाषण’
काय असतं ? ते विचार कसे पकडायचे हे अनुभव सिद्ध खेळातून आपण शिकवू शकतो.यालाच
‘थॉट कॅचींग’ किंवा ‘विचार पकडण्याची क्रिया’म्हणतात.त्यानंतर त्या विचारांची सत्यता
पडताळून चुकीच्या काल्पनिक विचारांना बदलून अचूक,वास्तववादी विचार करावयास शिकवू
शकतो.चिंतेच्या दुष्टचक्राला अगदी सुरुवातीलाच लगाम घालण्यास हे उपयुक्त ठरतं.चिंता
थोपवण्याचा दुसरा रामबाण उपाय म्हणजे ‘क्षणस्थ’ होणं.’Mindfulness’प्रक्रिया मनाला
स्थिर व क्षणस्थ करण्यास सर्वात लक्षणीय आहे असे प्रयोगांतून निष्पन्न झालं आहे.”आताच्या
क्षणाला एखाद्या गोष्टीवर कुठलाही किंतु/परंतु मनात न आणता पूर्ण लक्ष केंद्रित करणं” या
प्रक्रियेला Mindfulness म्हटलं जातं. ती ‘एखादी’ गोष्ट काहीही असू शकते उदा.स्वतःचा
श्वास,स्वतःचं शरीर ई.ह्या प्रक्रियेबद्दल मुलांना आपण लहान असल्यापासून प्रशिक्षण देऊ
शकतो.मनाला स्थिर व क्षणस्थ करण्यासाठी आणि चिंता व ताणतणाव कमी करण्यासाठी
Mindfulness हा हुकमी उपाय मानला जातो. तनय सारखी चिंतातूर मुलं ह्या दोन्हीही
उपाययोजनांनी नक्कीच ‘मानसिक सक्षम’ होतील.
By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.
No comments:
Post a Comment