एकविसाव्या शतकात कुणाला थांबायला वेळ नाही...जो तो पायाला भिंगरी
लागल्यासारखं पळत असतो.मुलांमध्ये हवी असलेली गोष्ट मिळेपर्यंत थांबण्याचा
धीर नाही तर मोठ्यांमध्ये झटपट श्रीमंती साठी चढाओढ लागलेली दिसते.रस्त्यावरसिग्नलला लालचा पिवळा आणि पिवळ्याचं हिरवा सिग्नल व्हायला पण धीर धरवत नाही..आधीच सिग्नल तोडून पुढे जायचं असतं..एवढी घाई कशासाठी? आपण जास्त आवेगशील झालो आहोत का? मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये सहनशक्ती,धीर आणि संयम आता विरळा होत चालला आहे का? सब्र का फल मीठा होता है....हे फक्त संतांच्या ओव्यापुर्तच मर्यादित राहिल आहे का ?
स्वतःच्या आवेगावर हळूहळू ताबा मिळविण्यास मुल अगदी एक वर्षांपासून शिकू लागतं.जसजसं मुल मोठ होतं तसं तीन ते सात वर्षांपर्यंत ती विविध अनोख्या पध्दतीनं स्वतःवर ताबा मिळवणं अपेक्षित असतं.नंतर पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये तीव्र भावनांना योग्य दिशा देणं,हव्या असलेल्या गोष्टीसाठी जास्त काळ धीर धरणं,ह्या गोष्टी अपेक्षित असतात.पण ह्या सर्व गोष्टी प्रत्येक मुलामुलीच्या बाबतीत दिसतातच असं नाही.काही मुलं अगदी ४-५ वर्ष लहान असतानाही संयम दाखवू शकतात तर काही प्रौढ सुद्धा आवेगशील आणि उतावळे असतात.
संशोधकांच्या मते ‘आवेगावर ताबा मिळविणं’(Impulse control) आणि ‘जास्त लाभासाठी थोडं काळ संयम दाखवता येणं’ (Delaying Gratification) ही दोन भावनिक कौशल्यं याला आवश्यक असतात.ही संयमाची कौशल्य तपासण्यासाठी आणि त्याचा भावी आयुष्यावर कसा लक्षणीय परिणाम होतो हे बघण्यासाठी एक अदभूत प्रयोग बऱ्याच वर्षांपूर्वी स्टान्फर्ड विद्यापीठामध्ये करण्यात आला.Marshmallows Test म्हणून हा प्रयोग जगप्रसिद्ध आहे. १९६० साली स्टान्फर्ड विद्यापीठातील बिंग नर्सरी स्कूलच्या ‘सरप्राईज रूम’ मध्ये हा अनोखा प्रयोग सुरु करण्यात आला,जो आजतागायत चालूच आहे.
ह्या प्रयोगात विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ४-५ वर्षांच्या मुलामुलींना एक एक करून ‘सरप्राईज रूम’ मध्ये नेण्यात आलं.त्या रूम मध्ये एका टेबल वर मार्शमेल्लो (Marshmallow) नावाची मुलांना आवडणारी अमेरिकन मिठाई ठेवण्यात येते. प्रत्येक मुलाला रूम मध्ये गेल्यावर दोन पर्याय देण्यात येतात. पहिल्या पर्यायाप्रमाणे आता लगेचच ती मिठाई खाऊ शकतोस असं त्यांना सांगण्यात येतं.दुसऱ्या पर्यायामध्ये त्यांच्या संयमाची थोडी कसोटी घेतली जाते.संशोधक रूम बाहेर जाऊन वीस मिनिटांनी परत येणार आहे असं सांगण्यात येतं,जर वीस मिनिटं मिठाई न खाता थांबलात तर त्यांना एक ऐवजी दोन मार्शमेल्लो मिळतील,असं सांगण्यात येतं !!
ती चार वर्षांची चिमुरडी समोर असलेल्या प्रलोभनावर विजय मिळवतात का नाही ?..आपल्या आवेगावर त्यांचा किती ताबा आहे आणि पुढे होणाऱ्या जास्त लाभासाठी ती थोडा काळ संयम दाखवू शकतात का ? ह्या विविध भावनिक कौशल्यांची तपासणी ह्या प्रयोगातून करण्यात येते. त्यातील काही मुलं मिठाई न खाता वीस मिनिटं थांबू शकतात तर काही संशोधक रूम बाहेर गेल्यावर त्वरित त्या मिठाईचा फडशा पाडतात. हा सर्व वीस मिनीटाचा त्यांचा संघर्ष छुप्या विडीयो कॅमेरा मध्ये टिपण्यात येतो.
आपल्या मनातील तीव्र इच्छेवर काबू मिळवताना मुल विविध अनोख्या पद्धतीचा अवलंब करतात.काही स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवतात,काही मिठाई तोंडापाशी आणून आपण खाल्याचा काल्पनिक विचार करून परत ठेवून देतात तर काही गाणं गुणगुणत तर काही दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करून आवेगावर ताबा मिळवतात. एवढ्यावर संशोधक थांबले नाहीत.त्यांनी ह्या मुलांचा पुढची २० वर्ष सलग पाठपुरावा केला.त्याचं प्रौढ झाल्यावर वर्तन,शारीरिक आणि मानसिक आरोग्य,त्यांची अभ्यासातील प्रगती आणि त्यांचा नातेसंबंध या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.त्यातील निष्कर्ष अतिशय लक्षणीय होते.
त्या प्रयोगातील जी मुलं मिठाई न खाता वीस मिनिटं थांबू शकली ती पुढे जाऊन पप्रौढपणी खेळकर,उत्तम मानसिक आरोग्य असलेली व सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षांमध्ये जास्त यशस्वी झालेली दिसली.भावनावेगावर ताबा मिळवणं आणि प्रलोभनाला बळी न पडता भविष्यातील जास्त लाभासाठी संयम ठेवता येणं ह्या दोन कौशल्याचा दूरगामी चांगला परिणाम ह्या अनोख्या प्रयोगातून अधोरेखित झाला आहे.
या प्रयोगाअंती संशोधकांनी काही क्लुप्त्या सांगितल्या आहेत. आपल्या पाल्यामध्ये ही संयमाची कौशल्य वाढवण्यासाठी आपण तीन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे त्यांना लहानपणापासूनच काही गोष्टींबाबत ‘नकार’ झेलण्याची सवय करणं,दुसरं म्हणजे हवी असलेली गोष्ट मिळवताना काही आव्हानं निर्माण करून थोडा थांबायला लावून संघर्ष करण्याची सवय करणं आणि तिसरी क्लुप्ती म्हणजे प्रलोभनं असताना निर्माण होणाऱ्या मनातील तीव्र भावनांनाबाबत त्यांना बालपणीच साक्षर करणं.संयमाची पाळमुळं अशी बालवयात रुजुविता येतात.नाहीतर पुढे जाऊन आवेगांवर ताबा नसल्यामुळे व प्रलोभनाला बळी पडून आयुष्याची गाडी रुळावरून घसरायला वेळ लागत नाही.
By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.
No comments:
Post a Comment