Thursday, 24 August 2017

विवाहबंधनातील भावनांचे प्रयोग

विवाहबंधनातील भावनांचे प्रयोगविवाह म्हणजे दोन व्यक्तींचे मनोमिलन ....दोन कुटुंब आणि त्यामधील सर्वांच्या भावनांना एकत्र आणणार माध्यम ..प्रेम,जिव्हाळा,आदर,सन्मान,आपुलकी तसेच राग,भीती,घृणा, असुया,आणि निराशा ह्या व अशा असंख्य भावनांचं एक अनोख दालन.खरतर ‘विवाह’ ही माणस जोडणारी,सहसंवेदना जपणारी आणि जाणीवा जागृत करणारी आश्वासक संस्था.पण ह्या विवाह्संस्थेबद्दल,तिच्या मुलभूत कार्यकारणाविषयी शंका निर्माण होईल अशी धक्कादायक परिस्थिती सध्या सर्व जगभर दिसत आहे.चाळीस ते पन्नास टक्के विवाह लग्नानंतर काही वर्षातच भंग पावत आहेत..आणि आता तर लग्न ते घटस्फोट हा कालही कमी होत चालला आहे विवाहसंबंधातील आणि त्या नात्यामधील एकसंधपणा हा ‘भावनिक सुसंवादावर’ अवलंबून असतो.नातं हे फुलण्याच्या ऐवजी तुटत कस जातं?..विवाह मोडण्याच्या पाऊलखुणा निर्माण कशा होतात? हे आता अनोख्या भावनांच्या प्रयोगशाळांमध्ये निर्विवाद सिद्ध होत आहे.अशा अदभूत विवाह ‘प्रयोगशाळेविषयी’.....

श्री :“माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का ?”
सौ :(उपरोधिक आवाजात) ... “माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का ?” तुला नाही टाकता येत? मी काय तुझी
दासी आहे,सारखं तुझ्या मागे मागे नोकरासारखं फिरायला?
श्री:(दबक्या आवाजात)..“दासीच बरी तुझ्यापेक्षा, ही कामे तिला वेळेवर नीट जमली तरी असती...”
हा संवाद एखाद्या टीव्ही सीरिअल मधील असता तर एकवेळ ठीक होत, पण एखाद्या घरात जर हे व असे
तिखट उपरोधिक बोलणे नित्यनेमाने होत असेल तर ..

हा खराखुरा प्रसंग आहे जॉन गॉटमन ह्यांच्या ‘विवाह प्रयोगशाळेमधला’..ह्या प्रयोगशाळेमध्ये गेली तीस वर्ष हा मानसशास्त्रज्ञ विवाहबंधनामधील भावनिक संवादावर संशोधन करीत आहे..घरामध्ये श्री व सौ मध्ये होणारे संवाद विडीओ टेप करून ह्या प्रयोगशाळेमध्ये बघितले जातात..त्यावर मग सर्व वैज्ञानिक तासन तास बसून सूक्ष्म निरीक्षणातून त्या संवादातील भावनिक अभिव्यक्तीचे परीक्षण(micro analysis)करतात..शेकडो जोडप्यामधील अशा संवाद निरीक्षणामधून मग संवादातील चुकांचा (fault lines) चा अभ्यास केला जातो...एखादे जोडपे पुढे जाऊन तीन वर्षात घटस्फोटापर्यंत जातील का ? ह्याचा अनुमान ह्या परीक्षणातून केला जातो.अशा अदभूत प्रयोगशाळेतील निष्कर्ष हे जवळ जवळ 95 टक्के खरे होतात असे निष्पन्न झाले आहे.इथे कुठेही ढोबळ भविष्यवाणी नसते,किंवा ज्योतिषशास्त्र वापरले जात नाही पण इथे संवादातील भावनिक अंतरंगाचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधले जातात..आणि ते सुद्धा तंतोतंत खरे... काही नवविवाहित तर काही जुनी जोडपी इथे परीक्षणासाठी असतात.जोडप्यामधील व्यक्तींचे सेनसर्स च्या माध्यमातून सूक्ष्म निरीक्षण केले जाते..त्यांच्या देहबोलीचा,चेहऱ्यावरील microएक्सप्रेशनचा,हृदयाची गती आणि शरीरात निर्माण होणाऱ्या संप्रेरकांचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला जातो..त्यातूनच मग हे अचूक अनुमान केले जातात.त्यानंतर मग जोडप्यामधील व्यक्तीला प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे बोलावले जाते आणि तीच विडीओ टेप परत दाखविली जाते.अशा प्रसंगात तो वादळी संवाद चालू असताना मनामध्ये कुठले विचार होते,नेमकं मनामध्ये काय चालल होतं ह्यासंबधी त्यांना बोलतं केलं जातं.मनाच्या स्क्रीन वरील भावनांच्या नाजूक ठश्यांचे निरीक्षण केले जाते..जसं काही ह्या विवाह प्रयोगशाळेत त्यांची भावनिक क्ष-किरण तपासणीच होत असते!!

संवादातील धोक्याच्या घंटा कुठल्या?जोडप्यामध्ये वाद होत असताना मत मांडली कशी जातात? दुसऱ्या व्यक्तीला समजुन घेतलं जातं अथवा नाही? मतभिन्नता कशी व्यक्त केली जाते ? बोचरी टीका केली जाते का दुसऱ्याच्या भावना स्वीकार केल्या जातात ?
विवाह्बंधानामध्ये तडे जायला कशी सुरुवात होते? ह्या व अशा असंख्य निरीक्षणातून विवाह संबधातील व ऋणानुबंधातील भावनिक दुव्यांचा खोलवर जाऊन अभ्यास केला जातो..नातेसंबंधावर भावनांचा किती प्रभाव आहे हे ह्यामधून अधोरेखित होते...
ह्या विवाह प्रयोगशाळेतील परिक्षण केलेला असाच एक खराखुरा प्रसंग .....

प्रिया,तिची मुलगी साना आणि नवरा नील मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातात.प्रिया आणि मुलगी कपड्यांच्या दुकानात जातात तर नील इलेक्ट्रोनिक डिजिटल शॉपमध्ये खरेदी करावयास जातो.शॉपिंग झाल्यानंतर एक तासात मॉलच्या दाराशी जमायचं ठरतं.त्यानंतर लगेचच बाजूच्या थीएटरमध्ये आयत्यावेळेला तिकीट काढून दुपारचा सिनेमा पहायचं ठरतं.प्रिया नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचते पण नीलला उशीर होतो ... “कुठे गेलाय हा ? सिनेमा सुरु व्हायला फक्त १० मिनिटं उरली आहेत.मोबाईल ही उचलत नाहीय..आयत्या वेळेस नेमकं उशीर करून पूर्ण आनंदावर विरजण टाकायची सवयच आहे तुझ्या बाबांची” प्रिया मुलीला तक्रारीच्या सुरात सांगत असते.तुझ्या बाबांचं नेहमीचच आहे हे,एक गोष्ट नीट करतील तर शपथ”. नील दहा मिनिटात पोहोचतो. ”जुना मित्र मध्येच भेटल्यामुळे उशीर झाला,sorry” असं म्हणून तो सारवासारव करावयास सुरुवात करतो.प्रियाचे उपरोधिक बोलणे काही थांबत नाही. “हं..या..आलास ...चांगलं काही ठरवलं की त्याचा विचका कसा करायचा हे तुला कसं अचूक जमत ह्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो,किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू ?”

सूचना,तक्रार आणि वैयक्तिक टीका ह्या मध्ये फरक असतो.इथे पूर्ण व्यक्तिमत्वावर व चारित्र्यावर दोषारोप केले गेले.बेजबाबदार व स्वार्थी अशी लेबलं लावून पूर्ण व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवले गले.हे सर्व योग्य शब्दात,परखडपणे पण उपरोधिक न होता सांगता आले असते पण प्रियाला ते जमले नाही.अर्थात भावनांबद्दलच्या काही मुलभूत कौशल्यांचा अभाव ह्याला कारणीभूत होता.हे असं जर वारंवार घडत गेलं तर तर ह्या नात्याचं पुढे काय होईल ते काही वेगळे सांगायला नको.. विवाहाची गाडी रुळावरून घसरण्यास
अशीच सुरुवात होते... सखोल प्रयोगातून अशा अनेक संवादातील संभाव्य धोक्याबद्दल मार्मिक वेवेचन विवाह प्रयोगशाळेमध्ये करण्यात येतात ..संवादामध्ये नेमकं काय व कसं बोलायचं आणि काय टाळायचे हे सुचवण्यात येते जोडप्यांमधील संवादामध्ये टीका,तक्रार अजिबात करायचीच नाही असे नाही.इथे प्रिया आणि नील मधील संवादाचा रोख व्यक्तिमत्वाकडे न जाता व्यक्तीच्या न पटलेल्या कार्यपध्दतीकडे व वर्तनाकडे असावयास हवा होता.काही मुलभूत ‘भावनिक कौशल्य’ असती तर कदाचित संवाद असा झाला असता .... “तू वेळेवर पोहोचला नाहीस की मला अतिशय चीड येते,आधी ठरवून सुद्धा उशीर झाल्यामुळे आम्हाला ताटकळत बसल्यासारखे वाटले आणि आता सिनेमा ही वेळेवर बघता येणार नाही, कदाचित मित्राला तू घाईत आहेस हे सांगता आले असते” इथे स्वतःच्या भावना व्यक्त केल्या जातात,अपेक्षा आणि गरजा सांगितल्या जातात व कुठली कृती आवडली असती हेही अभिव्यक्त केले जाते पण कुठेही पूर्ण व्यक्तिमत्वावर बोचरी टीका न करता आणि त्यात उपरोधीकपणा किंवा तिरस्कार न आणता !! दुसऱ्या व्यक्तीला इथे चुकीच्या कृतीची जाणीव करून दिली जाते पण चूक सुधारण्याची संधीही दिली जाते. मुख्य म्हणजे कुठेही दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करतोय, तुच्छ लेखतोय किंवा सदोष व्यक्तिमत्व आहे असा संदेश दिला जात नाही.नातं जपण्यासाठी आणि अधिक फुलविण्यासाठी हेही नसे थोडके!! 

टीका आणि तक्रार ह्यामधील फरक उधृत करणारी ह्या विवाह प्रयोगशाळेतील काही बोलकी उदाहरणे....
टीका: आपल्याला एवढा घरखर्च असताना तू कपड्यांवर एवढा खर्च कसा करू शकतोस ? किती बेजबाबदार
आणि स्वार्थी आहेस तू ?
तक्रार: तू कपड्यांवर खूपच खर्च केला आहेस,मला आपल्या आर्थिक स्थितीबद्दल काळजी वाटते

टीका :तू नेहमी स्वतःचच फक्त बघतोस,दर वीकेन्डला आम्हाला एकट सोडून तू निर्लज्जासारखा बाहेर
टवाळक्या मारतोस
तक्रार :तू वीकेन्ड ला मित्रांबरोबर बाहेर जातोस तेव्हा मला घरी खूपच एकट वाटतं
टीका :तुझे जमिनीवर लोळत असलेले कपडे उचलून मी अतिशय कंटाळली आहे,किती आळशी आणि वेंधळा
आहेस तू ?
तक्रार :तुझे सगळे कपडे तसेच जमिनीवर पडलेले असतात,त्यामुळे आपलं घर अतिशय अस्वच्छ दिसतं

गॉटमन ह्यांच्या विवाह प्रयोगशाळेमध्ये संवादातील उपरोधीकपणा,घृणा व तिरस्कार ह्या भावना तपासल्या जातात.देहबोली व चेहऱ्यावरील स्नायूंचा सूक्ष्म अभ्यास करून शब्दांपलीकडील संवादाविषयी जोडप्यामध्ये भान निर्माण केले जाते. ह्या प्रयोगशाळेत एक धक्कादायक पण बोचरं वैज्ञानिक सत्य समोर आलं आहे.

जर जोडप्यामधील संवादामध्ये सौ च्या चेहेऱ्यावर ’घृणा’ ही भावना पंधरा मिनिटात चार ते पाच पेक्षा जास्त वेळा व्यक्त झाली तर तो विवाह पुढील चार वर्षात भंग पावण्याच्या त्या हुकमी पाऊलखुणा समजाव्यात !!

एका घरात मुलांनी उछाद मांडलेला असतो.सतत भांडण चालू असतात.मंदार अतिशय अस्वस्थ होऊन आपल्या पत्नी मीनलला तक्रारीच्या सुरात....

“मीनल,तुला नाही वाटत मुलांनी थोडा शांत व्हावं? (मनातले अतिरेकी विचार...ही मुलांना खूपच मोकळीक
देते आणि अवास्तव लाडही करते) मंदारचा तिरकस प्रश्न ऐकून मीनल थोडी चिडचीडत... 
“मुलं मजा करतायत ना ..आणि झोपतीलच आता थोड्या वेळात (मनातील अतिरेकी विचार.. झालं ह्याचं सुरु
नेहमीचं तक्रार करणं..) मंदारचा रागाचा पारा वाढत जातो, दात ओठ खाण व हात झटकणं चालू होतं..
“आता त्यांना सरळ केलेच पाहिजे..झोपोवतोच त्यांना आत्ता...”(अतिरेकी विचार..प्रत्येक गोष्टीत मध्ये आडवी
येते ही..आता मला सर्व माझ्याच हातात घेतलं पाहिजे)
“नको..जाऊदे...मीच त्यांना झोपवते आता... तुझी सारखी कुरकुर आणि तक्रार ऐकण्यापेक्षा...” (बापरे! हा
आता रागाच्या भरात काहीही करेल..)
जोडप्यांमधील संवादात काय बोललं जातं (व्यक्त),त्यावेळी देहबोली कशी असते (अव्यक्त) आणि त्यामागचे मनातील अतिरेकी विचार काय असतात ? ह्याबद्दल अनेक विवाह प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करण्यात आले आहेत.दोन व्यक्तींमधील भावनिक सुसंवाद हा बऱ्याच अंशी मनातील अतिरेकी /विषारी विचारांवर अवलंबून असतो.ह्या अतिरेकी विचारांच्या मागे काही स्वतःबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची गृहीतिक आणि automatic thoughts असतात असं डॉ एरोन बेक ह्यांच्या प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे.त्याचप्रमाणे डॉ मार्टिन सेलीग्मन ह्यांच्या प्रयोगशाळेत मुलभूत आशावादी व निराशावादी विचारसरणीवर हे विचार अवलंबून आहेत असं दिसून आलं आहे.वरील संवादामध्ये मीनल निराशावादी विचारसरणीची असल्याने तिच्या मनातील विचार असे होते.
...
“ हा नेहमीच तक्रारी करून मला त्रास देत असतो”
मंदारचे मनातील समांतर विचार ..”ही माझं कधी ऐकतच नाही.स्वतःचच घोडं पुढ दामटते”
अशाप्रकारचे विचारच मग दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये तेढ निर्माण करावयास लागतात,हळूहळू छेद निर्माण
होऊ लागतात,व्यक्ती दुरावतात,नाती तुटतात आणि ह्या सर्वांचा अर्थातच घरातील मुलांच्या वाढीवरही
विपरीत परिणाम होऊ शकतो.
विवाहामध्ये वादळ निर्माण होण्यामागे व विवाहाचा रथ चौफेर उधळण्यामागे ‘चार भावनांच्या
घोडेस्वारांचा’ हातभार नेहमीच असतो असा निष्कर्ष ह्या विवाह प्रयोगशाळेमध्ये काढण्यात आला आहे.त्या
आहेत ‘टीका,तिरस्कार,बचावात्मक पवित्रा आणि अलिप्तता !! ह्या घोडेस्वारांना ‘Four horsemen of
Apocalapsy’असं म्हणण्यात येत.खरतर विवाहाचा रथ जर प्रेम,आदर,विश्वास आणि जिव्हाळा ह्या चार
भावनांच्या घोडेस्वारांकडे असेल तर नातं फुलत जातं आणि चिरकाल टिकतही पण जर नात्याच्या टप्प्यांमध्ये
जर बोचरी वैयक्तिक टीका येऊ लागली तर मात्र विवाहरथ उधळून दिशाहीन प्रवास करू लागतो ज्याचा
अंतिम मार्ग विसंवादाकडे आणि घटस्फोटाकडे जातो.पती-पत्नी मधील विसंवाद हा ह्या चार भावनिक
टप्प्यामधूनच जात असतो.
ह्या विवाह प्रयोगशाळांमध्ये जसे भावनिक विसंवादाच विवेचन केले जातं तसच त्यावरील सुसंवादासाठी
उपायही सुचवले जातात.
वर उल्लेख केलेल्या प्रिया आणि मीनल च्या उदाहरणामध्ये विसंवाद बोचऱ्या वैयक्तिक टीकेने झाला आहे.मॉल मध्ये वेळेवर न पोहोचणारा नील आणि मुलांबद्दल तक्रार करणारा मंदार दोघांचही वर्तन अस्वीकारार्ह होतं.पण संवादामध्ये “किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू “ आणि “सारखी कुरकुर आणि तक्रार करण्याची सवयच आहे तुझी” अशा वैयक्तिक टीकेमुळे पुढील आणिक भयंकर घोडेस्वार येऊन उभा ठाकला आणि तो म्हणजे
‘तिरस्कार(द्वेष)’. वैयक्तिक टीका कशी टाळायची हे आपण वर उदाहरणातून बघितले,आता टिके कडून प्रवास तिरस्काराकडे जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ह्यावर प्रयोगशाळेमधील उपाय सुचविले आहेत ते म्हणजे,आपण आपल्या भावना आणि मत दाबून न ठेवता ती योग्य प्रकारे व्यक्त करणे,प्रश्न आणि मतभेद हे त्याचवेळेस लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.उदा.राग व्यक्त करताना तो दुसऱ्याच्या विशिष्ठ कृतीबद्दल असावा पण पूर्ण व्यक्तिमत्त्व किंवा चारित्र्याबद्दल नसावा.त्यामध्ये आरोप आणि दोष देणे नसावे.दोन पावलं मागे जाण होऊ शकतं,तसच तुमचं म्हणणं सांगताना “तू नेहमीच....” “तू कधीच ....” किंवा “ तू असंच कर ...”असे शब्द टाळणे होऊ शकते.अर्थात इथे नील आणि मंदार ह्यांनी आपल्या सहचारीण्यांचा राग वेळीच ओळखून,तो स्वीकारून त्यासाठी योग्य प्रतिसाद आणि कृती केली असती तर रागाची दिशा टीकेकडे गेली नसती.

विसंवादातील पुढचा घोडेस्वार ‘तिरस्कार’ हा जास्तच तीव्र आणि विघातक असतो.जोडीदाराला जर दुसऱ्याबद्दल तिरस्कार वा विद्वेष असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी आणि मन दुखावण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करते.ज्या घरात द्वेष आहे तिथे आपुलकी,जिव्हाळा आणि आदर कसा वसणार ? विवाह प्रयोगशाळेमध्ये घरात ‘तिरस्कार’ असण्याच्या काही खुणा सूचित केल्या आहेत त्याम्हणजे अपमानित करणे,अपशब्द वापरणे ,कुचेष्टा आणि कुत्सीतपणे बोलणे ई.प्रयोगशाळेमधील उपायही सुचवण्यात आले आहेत..ते म्हणजे जास्तीत जास्त लवकर तिरस्काराला घरातून हद्दपार करावे.त्यासाठी स्वतःची संवाद शैली,विचारांची दिशा व देहबोली तपासून ती बदलण्याचा प्रयत्न करावा.जर तिरस्करणीय किंवा अपमानित करणारे विचार मनामध्ये असतील तर ते खोडून हळुवार,आशादायी व सुखावणारे विचार मनामध्ये आणावेत उदा.जरी मला आता ह्याच्या वागण्याबद्दल अतिशय राग आणि घृणा वाटत असली तरी तो इतर वेळेस व्यवस्थितही वागतो....आधीच्या आयुष्यामधील चांगल्या गोष्टी,सुखावणारे क्षण आणि उत्साहवर्धक प्रसंग आठवून जोडीदाराविषयी तिरस्कार कमी करता येईल ..नाहीतर पुढचा घोडेस्वार घरामध्ये शिरकाव करतो आणि तो म्हणजे बचावात्मक पवित्रा आणि पळवाट शोधणे .जेव्हा जोडीदाराला आपला वारंवार अपमान झाल्यासारखा किंवा कमी लेखल्यासारखं वाटतं तेव्हा तिचा किंवा त्याचा प्रतिसाद हा दुर्लक्ष किंवा कानाडोळा केल्या सारखा होतो. अशावेळेस घरात एकमेकांना ऐकून घेतले जात नाही,जबाबदारी झिडकारली जाते, काहीतरी सबबी सांगितल्या जातात किंवा उलट दुसऱ्यावर टीका केली जाते. विवाह प्रयोशाळेमध्ये संवादामधील शब्दापलीकडील देहबोली चे निरीक्षण करण्यात आले आहे .सतत कुरकुर करणं,हाताची घडी घालून ऐकणे,किंवा मानेला सारखा हात लावणे ह्या काही खुणा बचावात्मक पवित्रा दर्शवतात.तो कमी करण्यासाठी उपाय म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या टीकेकडे ‘तिखट शब्दात सांगितलेली माहिती’ ह्या स्वरुपात बघणे! ह्यामुळे संवादातील तेढ कमी होऊ शकेल,एकमेकांना कान देऊन ऐकणे होईल आणि दुसऱ्याला अपमानित केले जाणार नाही.हे सर्व सांगणं सोपं पण करणं कठीण असलं तरी प्रयत्न केल्यास पुढे परिस्थिती विकोपास तरी जाणार नाही. “माझ्या वागण्याचा तुला इतका त्रास होईल हे कळले नाही मला. माझ चुकलं असेल..ह्यावर आपण थोडं बोलूया का? अशा शब्दातून नात्यामध्ये जवळीक,विश्वास आणि हळुवारपणा येऊ शकतो.नाहीतर पुढचा घोडेस्वार.. ‘अलिप्तता’ घरामध्ये येऊन उभा ठाकतो.जेव्हा जोडीदार एकत्र येऊन समन्वय साधू शकत नाहीत,प्रश्नांचं निराकरण करू शकत नाहीत किंवा नात्यामध्ये सतत टीका,तिरस्कार आणि पळवाट शोधण्यावर भर देतात तिथे हा पुढला आणि चौथा घोडेस्वार ‘अलिप्तपणा’ घरात हजर होतो.मनाची कवाड बंद केली जातात,संवादाला वाव दिला जात नाही आणि नात्यामध्ये भिंती उभारल्या जातात. विवाह प्रयोगशाळेमध्ये अलिप्तता दाखवण्यामध्ये ८५ टक्के पुरुषच असतात असं निष्पन्न झालं आहे. “ न बोललेलं बर, कारण बोललं तर परत परिस्थिती तणावपूर्ण होईल”अशी त्यांची मनोधारणा झालेली असते . आपण अलिप्तपणे वागतोय हे ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी प्रयोगशाळेमध्ये काही उपाय सुचविले जातात.आपल्या जोडीदाराला संवादामध्ये बोलताना जास्त संधी द्या,प्रतिसाद देताना पूर्ण लक्ष व कान देऊन ऐका,होकारार्थी मान हलवून किंवा ”हं.. असं म्हणून संवादातील तुमचा सहभाग व रस व्यक्त करू शकता. जर वाद्विवादामध्ये तीव्र भावना निर्माण होत असतील वा ताणताणाव निर्माण होत असेल तर अशावेळेस
विवाह प्रयोगशाळेमध्ये जोडप्यांना स्वतःचा pulse rate बघण्यास सुचवले जाते.जर हृदयाची गती २० अंकांनी वाढली तर तेव्हा संवाद थांबवून थोडा वेळ शांत होऊन अर्ध्या तासाच्या आत परत संवाद सुरु केल्यास उपयुक्त
ठरत असं दिसत.ह्यामुळे नात्याची रथ अलिप्ततेच्या वाटेवर भरकटत नाही विवाह प्रयोगशाळेतील सुचविलेल्या ह्या सर्व क्लुप्या,उपाय,कौशल्य आणि सूचना त्या चार भयंकर अघोरी घोडेस्वारांना नात्यामधून दूर ठेवण्यास आणि विवाह रथ उधळू न देण्यास नक्कीच मदत करतील.अशा प्रकारच्या विवाह प्रयोगशाळा लग्नांअगोदरच उपयोगात आणल्या तर ? त्यांविषयी जोडीदारांमध्ये भान निर्माण केले तर ? त्याचे नक्कीच पुढचे अघटीत टाळायला मदत होईल,विसंवाद टळेल ,रेशीमगाठी घट्ट होतील,सुसंवादाच ओएसीस निर्माण होईल!  


By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.

No comments:

Post a Comment

How to make your anxiety work for you instead of against you

Anxiety is energy, and you can strike the right balance if you know what to look for. While some cases of anxiety are serious enough t...