तापमानाशी अगदी संलग्न असतं असं गेल्या दशकातील संशोधनातून निष्पन्न झालं आहे.सकाळी
गरम चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर आपल्याला छान वाटतं ते ह्या मानसिक तापमानाशी
निगडीत आहे.एखादा रागावला तर आपण सहजपणे म्हणतो ,तो “गरम झाला” किंवा एखादा
भावनिक प्रतिसाद देत नसेल तर आपण त्याला “थंड रक्ताचा”(cold blooded) असं संबोधतो.आपल्या भावना आणि शरीराचं तापमान यांतील संबंधावर खोलवर जाऊन संशोधन आणि विलक्षण प्रयोग झाले आहेत. मायेची ‘ऊब’,’थंडगार प्रतिसाद’ हे फक्त रूपक म्हणून वापरलेले शब्द नाहीत तर त्यामागील शरीरातील यंत्रणा कशी काम करते हे शास्रीय प्रयोगातून निष्पन्न झालं आहे.
येल विद्यापीठात दहा वर्षांपूर्वी शारीरिक आणि मानसिक तापमानावर व त्यांमधील दुव्यांवर विलक्षण प्रयोग करण्यात आला. ह्या प्रयोगामध्ये ४१ विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत बोलाविण्यात आलं.उद्वाहकामधून(Eleveter)चौथ्या मजल्यावरील प्रयोगशाळेत जाताना एक महिला प्रत्येक विद्यार्थ्याला गरम कॉफीचा कप किंवा थंडगार कॉफीचा कप हातात धरावयास सांगते.प्रयोगशाळेत गेल्यावर त्यांना एका काल्पनिक क्ष व्यक्तीबद्दल माहिती सांगितली जाते आणि त्या माहितीवरून त्याचे व्यक्तिमत्व किती उबदार आहे हे पारखायला सांगितलं जातं.प्रयोगाचा निष्कर्ष अतिशय अनोखा येतो .ज्या विद्यार्थ्यांनी गरम कॉफीचा कप हातात धरला असतो ते विद्यार्थी तो व्यक्ती प्रेमळ,दयाळू आणि मनमिळाऊ आहे असं पारखतात तर त्या उलट थंडगार कॉफीचा कप हातात घेणारे विद्यार्थी त्या क्ष व्यक्तीला प्रेमळपणाबद्दल कमी गुणांक देतात ! जेव्हा त्या विद्यार्थ्यांचे हात उबदार होतात तेव्हा त्यांचं मनही उबदार होतं असाच निष्कर्ष या प्रयोगातून निघाला !!
आणिक एका प्रयोगात सहभागी व्यक्तींना अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांचे फक्त चेहेरे दाखविले जातात आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल कयास करावयास सांगितले जाते.ह्या प्रयोगाआधी काहींना उबदार(७९F) तर काहींना थंडगार(६८F) खोलीमध्ये बसविले जाते.जे सहभागी उबदार खोलीत थांबलेले असतात ते गुन्हेगारांनी कमी तीव्रतेचा गुन्हा उदा भुरटी चोरी, करचुकवेगिरी केला असेल असा अंदाज व्यक्त करतात तर त्यापेक्षा ११ डिग्रीने कमी तापमान असलेल्या थंडगार खोलीमध्ये थांबलेले सहभागी त्याच गुन्हेगारांनी अट्टल गुन्हा केला आहे उदा मर्डर,अपहरण करणे इ असा अंदाज बांधतात ! हे सर्व त्यांच्या मानसिक तापमानाशी निगडीत आहे एकमेकांबद्दल प्रेम,विश्वास आणि सहकार्याची भावना ही शारीरक तापमानाशी निगडीत आहे असं सिद्ध झालं आहे.त्यासाठी एक प्रयोग करण्यात आला.चाळीस सहभागी व्यक्तींना ह्या प्रयोगात पाचारण करण्यात आलं.फंक्शनल एमाराय(fMRI) नावाच्या मेंदूच्या कार्याचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक यंत्राखाली त्या व्यक्तींना ठेवण्यात येतं.त्यांना एक आगळावेगळा खेळ खेळावयास दिला जातो.ह्या खेळात त्यांना आदमासानं थोड्या प्रमाणात पैसे दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर गुंतविण्यात सांगण्यात येते.
त्या यंत्राखाली असताना मग त्यातील काहींना बर्फाचा थंडगार तुकडा काही सेकंद हातात धरावयास सांगण्यात येतो.तर काहींना गरम केलेला डबा हातात दिला जातो.ह्या प्रयोगांती संशोधकांना असं दिसून येतं की ज्याना थंड गोष्ट दिली गेली ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर विश्वास ठेवून पैसे गुंतविण्यासाठी तयार नव्हते.मेंदूमधील कुठला भाग हा निर्णय घेताना उद्दीपित होत आहे त्याचप्रमाणे शारीरिक तापमानाची नोंद कुठे करण्यात येते हे त्या fMRI मशीन खाली बघण्यात आलं .शारीरिक तापमान आणि मानसिक तापमान मेंदूमधील एकाच भागामधून प्रवर्तित होतं असं निष्पन्न झालं.इन्सुला (Insula)ह्या भागातून हे सर्व कार्य होत असतं असं सिद्ध झालं आहे. आता ह्या सर्व प्रयोगांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घ्यावयाचा हे पाहूया.
नवजात बाळाला जेव्हा त्याची आई आपल्या कुशीत घेते तेव्हाही फक्त शारीरिक तापमान नाही तर मानसिक तापमान,मायेची ऊब,प्रेम आणि विश्वास ह्या भावना ही त्यामधून संक्रमित होतात आणि परस्पर सुरक्षित वातावरण ती माता त्या बाळासाठी निर्माण करू शकते. आंटार्टिका मध्ये पेंग्विन जसं दाटीवाटीने राहून एकमेकांना उब देतात तसंच आजकाल विविध खेळाडूही खेळ सुरु व्हायच्या अगोदर huddle करताना आपण बघतो.त्यामध्ये एकमेकांना आलिंगन देऊन फक्त शारीरिक नाही तर मानसिक तापमान वाढून एकमेकांबद्दल विश्वास आणि सहकार्याची भावना वाढीस लागु शकते.
गमतीनं असंही म्हणता येईल की पुढच्या वेळेस तुम्हाला तुमच्या बॉस कडून बढती हवी असेल तर गरम कॉफीचा कप त्यांच्या हातात नक्की देऊन बघा! त्यांना तुमच्या बद्दल जास्त आपुलकी वाटून कदाचित तुमचं काम फत्ते होईल !!
By-
Dr. Sandeep Kelkar.
Pediatrician & EQ consultant.
No comments:
Post a Comment